पुणे - शहरातील चांदणी चौक व कात्रज रस्ता यासाठी 400 कोटी रुपये बांधकामासाठी आणि जमीन अधिग्रहणासाठी 400 कोटी रुपयांचा खर्च आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने तो मंजूर केला आहे. या रस्त्याबाबतच्या इतर अडचणीही दूर केल्या आहेत. फक्त यासाठी थोडा ज्यास्त वेळ लागत असल्याने तो कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चांगले रस्ते पाहिजे असतील तर टोल द्यावाच लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
कामे लवकर पूर्ण करण्यावर भर -
गडकरी यांनी शनिवारी पुण्यातील चांदणी चौक येथील पुलाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर पुणे परिसरातील रस्त्यांच्या परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आजपासून एका वर्षाच्या आत पुलाचे काम पूर्ण करता येईल का याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नवले पूल ते कात्रज बोगदा रस्त्याच्या कामाच्याही सूचना दिल्या आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर रहदारी वाढली आहे. या रस्त्याच्या कामासाठी 600 कोटी मंजूर केले आहेत. त्याचे काम लवकरच सुरू होईल. तसेच पुणे-शिरूर-नगर या रस्त्याच्या कामासाठी 6 हजार कोटी रुपये एवढा खर्च आहे. त्याचे काम सहा महिन्यात काम सुरू होईल, असे गडकरी म्हणाले.
पालखी मार्गाचाही गडकरींनी आढावा घेतला. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम ही लवकरच सुरू केले जाईल. फेब्रुवारीनंतर मोठा कार्यक्रम घेऊन काम सुरू होणार आहे. या रस्त्यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दोन्ही पालखी मार्ग हे केवळ रस्ते न राहता, भक्ती कसे होतील, यासाठी नागरिकांनी आणि तज्ञांनी आपल्या कल्पना मांडाव्यात. त्या निश्चित स्वीकारल्या जातील, असे गडकरी म्हणाले.
दरम्यान, या रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकर करत असल्याने आता टोल बंद करणार का? असा प्रश्न गडकरींना पत्रकारांनी विचारला. त्यावर 'चांगले रस्ते पाहिजे असतील तर टोल द्यावा लागेल' असे उत्तर गडकरी यांनी दिले.