पुणे - आपला देश धनवान असतानादेखील भाजप धनवान बनली नाही, याचा जनतेने विचार करायला हवा. काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले आहे. या ६० वर्षात काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते पुण्यात भाजपचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राचे सिंचन ५० टक्केच्यावर जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सिंचनाच्या अनेक योजना अपूर्ण राहिल्या आहेत. त्यामुळे १० ते १५ वर्षापासून ते प्रकल्प ठप्प पडले आहेत. हे पाहून बोलू नये, पण बोलावे लागते 'लग्न एकाने केले, पोर दुसऱ्याला झाली, आणि पोर सांभाळायची जबाबदारी आमच्यावर आली', अशी कोपरखळी गडकरी यांनी यावेळी लगावली.
काँग्रेसच्या काळात ७० हजार कोटी रुपयांची विमान खरेदी झाली. त्याची काही गरज नव्हती. हा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरता आला असता, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. पुण्याचे अनेक प्रश्न भाजपच्या काळात मार्गी लागले, पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ भाजपने मार्गी लावले. मात्र, शरद पवार केंद्रात मंत्री होते, परंतु त्यांना पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न सोडवता आला नाही, असेही ते यावेळी म्हणाले.