पुणे - लोणावळा शहरात ख्रिसमस नाताळ आणि नूतन वर्षाच स्वागत करण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्या काही प्रमाणात घटू शकते. मात्र महानगरपालिकांच्या क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केल्याने पर्यटकांची पाऊले आपोआप लोणावळ्याकडे वळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यशासनाकडे लोणावळ्यात देखील ख्रिसमस नाताळ आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव लोणावळा पोलिसांनी सादर केला आहे. लोणावळ्याचे डीवायएसपी नवनीत कावत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
लोणावळा दरवर्षी पर्यटकांच्या गर्दीने फुललेले असते
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. परिसरात अनेक निसर्गरम्य अशी पर्यटनस्थळ असल्याने प्रत्येकाला लोणावळा शहर आकर्षित करत. दरवर्षी मुंबई, पुणे या शहरातून हजारो नागरिक विशेष सुट्टी काढून लोणावळा शहरात नूतन वर्षाचे स्वागत आणि नाताळ हा सण साजरा करण्यासाठी हमखास येतात. मात्र, यंदा त्यांच्या आनंदावर कोरोना विषाणुमुळे विरजन पडण्याची शक्यता आहे.
लोणावळ्यातही लागणार नाईट कर्फ्यू? महानगर पालिकेच्या क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यु...यावर्षी कोरोना महामारीमुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. त्यात, महानगर पालिकेच्या क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यु लावल्याने तरुणाईमध्ये देखील नाराजीचा सूर आहे. त्यामुळे अनेकांची पावलं ही लोणावळ्याकडे वळण्याची चिन्ह आहेत. मात्र, लोणावळा शहरात देखील कर्फ्यू लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोणावळा पोलिसांनी तसा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला आहे.
लोणावळ्यातही लागणार नाईट कर्फ्यू? कोरोनामुळे हॉटेल व्यवसायिक जैसे थे... कोरोना महामारीमुळे यावर्षी हॉटेल व्यवसायिकांनी देखील म्हणावी तशी तयारी केली नसल्याचे पाहायला मिळत आहे. उपल्बध सुविधांचा ग्राहकांना पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे लोणावळ्याच्या चिक्की व्यवसायिकांनी मात्र, पर्यटकांच्या स्वागतासाठी कंबर कसली असून त्यांच्या व्यवसायावर मात्र कोरोनाचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचा पाहायला मिळत आहे.
पोलिसांच्या सूचनानंतर करणार तयारी...दरवर्षी नाताळ आणि नूतन वर्षासाठी हॉटेलमध्ये पार्टीच आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हॉटेल व्यावसायिकांनी तशी योजना केलेली नाही. पोलीस सूचना करतील त्याप्रमाणे तयारी केली जाईल, अद्याप हॉटेल व्यवसाय पूर्ववत सुरू झालेला नसल्याची माहिती येथील हॉटेल व्यवसायिक सांगत आहेत.
लोणावळ्यातही लागणार नाईट कर्फ्यू? लोणावळ्यात न येण्याच पर्यटकांना आवाहन-दरम्यान, येथील नागरिकांनी देखील लोणावळ्यातील कर्फ्यूला पाठिंबा दर्शविला असून यावर्षी पर्यटकांनी पर्यटनस्थळी न येता घरातच राहून ख्रिसमस नाताळ आणि नूतन वर्षाचा स्वागत करावे असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे. त्यामुळे लोणावळ्यात येण्याची योजना असल्यास पर्यटकांनी तेथे मिळणाऱ्या सुविधांचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे आवाहन स्थानिकांकडूनही करण्यात येत आहे.