लोणावळा (पुणे) : नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात लोणावळा पोलिसांनी राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार, पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यात 25 डिसेंबर ते 05 जानेवारी दरम्यान रात्री 11 ते पहाटे 6 या वेळेत कर्फ्यू लागू असणार आहे. नाताळ आणि नववर्षाच्या उत्सवावेळी लोकांनी गर्दी करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ब्रिटनमधील कोरोनाने नाईट कर्फ्यु पुन्हा आणला..
लोणावळा हे पर्यटनस्थळ असून दरवर्षी हजारो पर्यटक नाताळ आणि नूतन वर्षाच्या स्वागतासाठी येत असतात. परंतु, यावर्षी परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. जगभरात आधीच कोरोना विषाणू थैमान घालत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विकसीत कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रामध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे शहरातील पर्यटक आता लोणावळ्यात येऊन गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच लोणावळा पोलिसांनी राज्यशासनाला नाईट कर्फ्यूचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला असून, 25 डिसेंबर ते 05 जानेवारी पर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे.
या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता होती..
पुणे ग्रामीण हद्दीतील पर्यटकांची व नागरिकांची लोणावळा, अॅम्बी व्हॅली लवासा, भुशी डॅम, मुळशी डॅम, ताम्हिणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटन स्थळी तसेच फार्म हाऊस, रिसॉर्ट इत्यादी ठिकाणी नाताळ आणि नववर्षानिमित्त गर्दी होण्याची शक्यता आहे.