पुणे - शनैश्चर जयंती आज (10 जून 2021, गुरुवार) साजरी केली जात आहे. तसेच, उत्तर भारतात साजरी केली जाणारी वटपूजा आणि सूर्यग्रहण, असा हा तिहेरी योग आहे. या दिवसाच्या तिहेरी महत्त्वाचा विचार करता धार्मिक परंपरेनुसार काय करावे? शनैश्चर जयंती निमित्त काय विधी करावेत? तसेच आज होणाऱ्या सूर्य ग्रहणाचा भारतीय जनमानसावर काय परिणाम होणार? हे जाणून घेऊया.
वैशाख कृष्ण अमावस्या प्लव नाम संवत्सर शके 1943 अर्थात गुरुवार 10 जून 2021 या दिवशी भावुका अमावस्या असते. तसेच, शनैश्चर जयंतीदेखील असते.
काय आहे भावुका अमावस्या?
भावुका अमावस्येला पर्णकुटीमध्ये म्हणजेच झाडांची पाने-फुले यापासून बनवलेल्या कुटीमध्ये भावुका देवीची; तसेच कुंती, पांडव, द्रौपदी यांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्याची पूजा केली जाते. या दिवशी उत्तर भारतीय लोक वडाच्या झाडाची पूजा करतात. तर आजच दुपारी 12 वाजता शनैश्चर जन्म असल्याने शनैश्चर महाराजांची जयंती साजरी केली जाते.
शनैश्चर जयंती
शनैश्चर जयंती निमित्ताने शनैश्चर महाराजांना तेलाने अभिषेक केला जातो. काळ्या आणि निळ्या फुलांनी शनि महाराजांची पूजा केली जाते. तसेच गोरगरिबांना अन्नदान दिले जाते. या दिवशी योगायोगाने यंदा सूर्यग्रहण आहे. पण हे सूर्यग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही. भारतीय लोकांनी याचे वेदाधी नियम पाळण्याची गरज नसल्याचे धर्म अभ्यासक सांगतात.
सुर्यग्रहणाचा कालावधी
हे ग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी, तर भारतीय वेळेनुसार या ग्रहणाचा मध्य दुपारी 4 वाजून 12 मिनिटांनी आहे. या ग्रहणाचा पृथ्वीवरील मोक्ष 6 वाजून 41 मिनिटांनी आहे. दरम्यान हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. आशिया खंडातील उत्तरेकडील भाग, युरोपचा वरचा भाग, आफ्रिका खंड, अटलांटिक महासागर या परिसरात हे सूर्यग्रहण दिसणार आहे.
हेही वाचा - बंगाली अभिनेत्री, खासदार नुसरत जहां विभक्त, लग्न बेकायदेशीर असल्याचा दावा