बारामती - आगामी नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सुधारित केंद्रीय मोटर वाहन कायदा राज्यात लागू होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात बेशिस्त वाहनचालकांना आता काळजीपूर्वक वाहन चालवावे लागणार आहे.अन्यथा दंडासह तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
या सुधारित कायद्यामुळे बेशिस्त वाहन चालकांसह वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रण राखता येणार आहे. केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये हा कायदा लागू केला होता. राज्य सरकारने या कायद्यात सुधारणा करून नववर्षात कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेशिस्त वाहनचालकांना बसणार आळा..
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीतील बारामती, इंदापूर, दौंड भागातील बेशिस्त वाहनचालकांवर तसेच वेगाने वाहन चालविणाऱ्यावर या नव्या कायद्याने कारवाई होणार असल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. या सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार वेगाने वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई आवश्यक..
सध्या राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु आहे. ट्रक- ट्रक्टर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतूक केली जाते. अनेकदा ऊस वाहतूक करणारे वाहने नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे वाहने चालवले जात असल्याचे आढळून येते. त्यामुळे अनेकदा अपघात होतात यावरही परिवहन विभागाने लक्ष केंद्रीय आवश्यकता आहे.
असे आहेत नवीन नियम..
- वाहन विमा नसणे - २,००० रुपये दंड किंवा ३ महिने शिक्षा.
- मद्यपान करून वाहन चालविणे - ३ ते १० हजार रुपये दंड.
- गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे - १ हजार ते ५ हजार रुपये दंड.
- वाहन परवाना नसताना गाडी चालविणे - ५०० ते ५,००० दंड.
- धोकादायक पद्धतीने गाडी चालविणे - १ हजार ते ५ हजार रुपये दंड.