पुणे - शहरातील प्रस्तावित वाढीव मेट्रो मार्ग आणि एचसीएमटीआर प्रकल्पांबद्दल लोकांचे हित आणि पुढील ५० वर्षांचा शहराचा विकास लक्षात घेऊनच निर्णय घेण्यात येतील. यामध्ये कोणत्याही स्वरुपाचे राजकारण केले जाणार नाही. यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा आणि काँग्रेसचा विरोध किंवा अन्य एखाद्या पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष दिले जाणार नाही. शहर आणि जिल्ह्यात कोणतेही प्रकल्प नागरिकांचे हित, शहराची गरज लक्षात घेऊन विविध तज्ज्ञ सल्लागारांचे विचार घेऊनच राबविण्यात येईल, असे स्पष्ट मत पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा नियोजन बैठकीत त्यांनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी राज्यमंत्री, खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.
पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी विकत घेण्यापेक्षा धरण विकत घेतलेले बरे, असे वक्तव्य आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मांडले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांची सूचना योग्य आहे, पुणे, पिंपरीला पाणी पुरवठ्यासाठी स्वतःच्या धरणाची गरज आहे. मात्र, धरण बांधता येईल, अशी जागा पुण्यात कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही मुळशी धरणातील पाणी पिण्यासाठी कसे वापरता येईल, यासाठी प्रयत्नशील आहोत.
पुढे बोलताना पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही जिल्ह्यात काम करत आहोत. पुणे जिल्ह्यात धरणासाठी एकही साईड शिल्लक नाही. त्यामुळे नवे धरण बांधणे शक्यच नाही. यासाठी केवळ मुळशी धरणाचा पर्याय आहे. परंतु, या धरणाच्या पाण्यावर प्रामुख्याने वीज निर्मिती केली जाते. शासनाचे पाण्यासंदर्भात धोरण निश्चित आहे. यामध्ये प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून, नंतर शेती आणि नंतर औद्योगिक वापरासाठी आहे. त्यामुळे मुळशी धरणातील पाणी शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी वापरता येऊ शकते, असेही अजित पवार यांनी येथे सांगितले.