पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशी देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. शनिवारी दिवसभरात 689 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 15 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे, शनिवारी 580 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, शनिवारी शहरातील बाधित रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला असून, 6 हजार 480 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पाचव्या दिवशी बाधित रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा पार केला असून, एकूण संख्या 10 हजार 446 वर पोहचली आहे. तर 580 जण हे कोरोनामुक्त झाल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.
दरम्यान, आज(रविवार) लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून, पुन्हा नागरिक रस्त्यावर पाहायला मिळतील. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शनिवारी मृत झालेला रुग्ण आकुर्डी ( स्त्री, ६५ वर्षे) पिंपरी (पुरुष, ७२ वर्षे, स्त्री, ६० वर्षे, पुरुष,५६ वर्षे) काळेवाडी ( पुरुष, ७९ वर्षे, पुरुष, ४९ वर्षे) चिंचवड (पुरुष, ५५ वर्षे) संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष, ३७ वर्षे व पुरुष, ७५ वर्षे) भोसरी (पुरुष,५३ वर्षे, पुरुष, ४२ वर्षे, पुरुष ३८ वर्षे) निगडी (पुरुष, ६५ वर्षे) खेड (पुरुष, ७० वर्षे) खडकी (स्त्री, १२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.