पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe) यांनी प्रवेश केल्यानंतर त्या आज पहिल्यांदा पुण्यातील शिवसेनेच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात संघटना शिबिरही आयोजित करण्यात आले होते. शिबिरानंतर नीलम गोर्हे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. त्यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘उद्धव ठाकरे राजा तर मी प्रजा आहे' त्यामुळे मी उद्धव ठाकरेंवर कसे बोलणार असे म्हणत त्यांनी ठाकरेंविषयी बोलणे टाळले.
जनता दरबार होणार : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांचे आज पुणे येथील शिवसेना भवनात आगमन झाले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. नीलम गोर्हे म्हणाल्या की, शासनाने अनेक चांगले निर्णय घेतले असून ते लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमासाठी पुण्यात बैठक झाली असून जनता दरबार देखील होणार असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
पवारांबद्दल बोलण्याइतकी 'मी' मोठी नाही : अजित पवार यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना गोर्हे म्हणाल्या की, नवे मित्र आले की ताकद वाढते, त्यामुळे अनेक नवीन कार्यकर्ते पक्षात येणे चांगले लक्षण आहे. राज्य सरकार महिलांसाठी चांगले निर्णय घेत आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याइतकी मी मोठी नाही. अजित पवार यांच्या मनात मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. मात्र शिवसेना मुख्यमंत्रीपद सोडणार नसल्याचे संकेतही गोऱ्हे यांनी दिले आहेत.
शरद पवारांच्या टीकेत तथ्य नाही : ठाणे रुग्णालयाची अर्धवट माहिती बाहेर आली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या टीकेत तथ्य नाही. या घटनेबाबत मंत्री महोदयांनी एक समितीही नेमली असून मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत. सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असून कोणाचीही गय केली जाणार नाही, असे नीलम गोर्हे म्हणाल्या. नवाब मलिक यांनी कुठल्या पक्षात प्रवेश घ्यायचा हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे आपल्याला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाबाबत काही बोलायचे नसल्याचे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -