पुणे - समाजातील पुरुष व स्त्री वर्गाला मला सांगायचे आहे की, आपणाला समाज उभा करायचा आहे, हा देश पुढे न्यायचा आहे. हा देश पुढे न्यायचा असेल तर स्त्री आणि पुरुष एकत्रित येऊन व अहिल्यादेवींचा आदर्श पुढे ठेवून आपणाला पुढे जायचे आहे. त्याची तयारी आपण सुरू करायला पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्र्याचे नाव समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण
अहिल्याबाई या महिलांना संधी देणाऱ्या होत्या. आपले कर्तृत्व दाखवणाऱ्या होत्या. आज त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास समाजासमोर आहे, असेही पवार म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या बारा फुटी पुतळ्याचे अनावरण काल शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्तुत्वाचा अधिकार केवळ पुरुषांनाच नाही, तर तो स्त्रियांनाही
महाराष्ट्र राज्याची जबाबदारी माझ्याकडे असताना महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सुरुवातीला ते लोकांना पटले नाही. हे जमेल की नाही, असे लोक म्हणू लागले. तत्कालीन सरकारमध्ये या संबंधी चर्चा झाली. या चर्चेत मी त्यांना प्रश्न केला की, जवाहरलाल नेहरू व लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर देशाची प्रतिष्ठा वाढवणारी एखादी व्यक्ती तुम्हाला आठवते का? त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांचे नाव सांगितले. जगात भारताचे नाव लौकिक करण्याचे काम इंदिरा गांधींनी केले. देशाचा कारभार एक महिला सक्षमपणे चालवू शकते. कर्तुत्वाचा अधिकार केवळ पुरुषांनाच नाही, तर तो स्त्रियांनाही आहे, त्यांना संधी द्यायला हवी, असे पवार म्हणाले.
कार्यक्रमाप्रसंगी खासदार संभाजी राजे, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज यशवंत राजे होळकर, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप, रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यासह जेजुरी संस्थांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा - प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा