पुणे - महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांनी बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमिवर दौंड शहरात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्यावतीने अजित पवार यांनी परत यावे, यासाठी हातात फलक घेऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी 'अजित दादा परत या' अशा घोषणा दिल्या.
या मोर्चात असलेल्या पदाधिकाऱ्यांनी हातात पकडलेल्या फ्लेक्स वर "अजित दादा, या जगात साहेबांवर सगळ्यात जास्त जीव असेल तर तो तुमचाच", अजित दादा परत या, 'राष्ट्रवादी काँग्रेसच कुटुंब' असा मजकूर होता.
अजित पवारांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका अजित पवार यांची वैयक्तिक भूमिका असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विरोधात बंड केले असल्याचे बोलले जात आहे.
दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज अजित पवार यांनी घेतलेली भूमिका रद्द करून शरद पवार यांच्यासोबत यावे यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उभा राहून घोषणा दिल्या.