पुणे : मागच्या महिन्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी कर्मवीर भाऊराव पाटील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असे वक्तव्य केले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका (Sharad Pawar Critics On Chandrakant Patil) केली आहे.
मंत्री पाटील यांच्यावर टीका : शरद पवार (NCP Sharad Pawar Critics) म्हणाले की, महाराष्ट्रातील माणूस कधी भीक मागत नाही, पण मागे एका नेत्याने सांगितले महापुरुषांनी भीक मागितले पण महाराष्ट्रातील माणूस मोठ्या हिमतीने, कष्ट करून संकटावर मात करतो, असे म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला एक जानेवारी २०२३ रोजी १७५ वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने राज्यात जनजागर यात्रा सुरू करण्यात येत आहे. याचे उद्घाटन पक्षप्रमुख शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
महिलांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस : शरद पवार पुढे म्हणाले की, आजचा दिवस हा देशातील महिलांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. या देशात समाज परिवर्तन करण्याचे काम काळ अनुकूल नसताना ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी केलं आहे. महात्मा फुले हे आधुनिकता, विज्ञान या सगळ्यांचे पुरस्कर्ते होते. शेती खात्याचा मंत्री झाल्यावर या क्षेत्रात सगळ्यात चांगले काम कोणी केलं याची माहिती घेत होतो. याचा रेकॉर्ड पाहत असताना मला आढळले की शेती क्षेत्रात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी चांगलं काम केलं आहे.
बेरोजगारी दूर करण्याची मागणी : ते पुढे म्हणाले की, तुम्ही सर्वजणी सावित्रीच्या लेकी म्हणून अभिमानाने काम करत आहात. आज तुम्ही महागाईच्या प्रश्नावर कार्यक्रम हातात घेतला आहे. सामान्य माणसाला महागाईच्या गर्तेत ढकलून देण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत.या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे.अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायची नाही. बेरोजगारीच संकट आहे, लोकांना काम करण्याची संधी दिली जात नाही.इथले उद्योग बाहेर जात आहे.याच कारण बेरोजगारी वाढत आहे.त्याचे सामाजिक परिणाम दिसत आहेत. आज बेरोजगारीमुळे मुलांची लग्न थांबली आहेत. सरकारने रोजगार वाढण्यासाठी निर्णय घेतला पाहिजे,पण सरकार ते करत नाहीत.
राज्यात जनजागर यात्रा : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यात जनजागर यात्रा काढण्यात येणार आहे. देशातील वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात या यात्रेच्या मध्यामतून आवाज उठवण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजीया खान व खासदार सुप्रिया सुळे याप्रसंगी उपस्थित होत्या.
महाराष्ट्रात महिलांचा अपमान : यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या राज्यात सत्तेत असलेल्या लोकांकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. महिलांविषयी बोलतांना सर्रास त्यांची नावे घेतली जातात. ती महिला कुणाची तरी आई आहे, बहीण आहे, मैत्रीण आहे, बायको आहे. हे ध्यानात ठेवा. आपण जी भाषा वापरतो ती खरोखरच सुसंस्कृत आहे का, प्रत्येक महिला, प्रत्येक कृतीवर आपण बोललेच पाहिजे असे नाही. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली म्हणाले होते, ज्या दिवशी मीडिया ह्या गोष्टी दाखवणे बंद करेल त्या दिवशी हे थांबेल. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होत त्याच्याशी आपला काय संबंध आहे, असा प्रश्न यावेळी सुळे यांनी केला.