पुणे : इंडिया आघाडीची बैठक काही दिवसांवर आली असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केलेय. शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीत फूट नाही. अजित पवार आमचेच नेते आहेत. ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांदे निर्यातीवरील शुल्काबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शरद पवार म्हणाले, कांद्यावर ४० टक्के लावलेला कर केंद्र सरकारने कमी करावा. कांद्याच्या उत्पादन खर्चाला काडीची किंमत मिळत नाही. यामुळे शेतकरी रस्त्यावर येत आहेत. केंद्र सरकारनं कांदा खरेदीला दिलेली रक्कम शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही. कांदा हे जिरायती शेतकऱ्यांच पीक आहे. त्यामुळे सरकारनं त्याच्याकडं अधिक सहानुभूतीनं पाहिलं पाहिजे. काल, मी केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मी कृषीमंत्री असताना कांदे निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात कर कधी लावला नव्हता. त्यामुळे युतीत हा प्रश्न झाला, असं म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे चाळीस टक्के कर का लावला, याचा केंद्र सरकारने खुलासा करावा. मात्र, माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. साखरेच्या निर्यातीवरून बंधन आणावीत, याबाबत केंद्र सरकारच्या मंत्रालयात चर्चा चालू आहे. ही बंधने लागू झाली तर साखरेचे बाजारभाव आणखी खाली येतील, अशी शक्यता माजी केंद्रीय कृषीमंत्री पवार यांनी व्यक्त केलीय.
काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. मात्र, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून पक्ष लगेच फुटला म्हणायचं काही कारण नाही-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
न्यायालयात आकडेवारी आणि वस्तुस्थिती महत्त्वाची- भाजपाचे आमदार व विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिलीयं. प्रवीण दरेकर म्हणाले, शरद पवार यांनी न्यायालयीन लढ्यासाठी वक्तव्य केले असले तरी त्याचा न्यायालयीन लढ्यात फरक पडणार नाही. कारण, न्यायालयात आकडेवारी आणि वस्तुस्थिती महत्त्वाची असते. मात्र, ज्यांच्या जीवावर राजकारण सुरू आहे, त्या कार्यकर्त्यांनी काय समजायचे? पंतप्रधान मोदींना पाठिंबा असल्याचं कार्यकर्त्यांना एकदाच सांगून टाका. आम्हालाही बरं वाटेल.
शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या गटानं भाजपाला समर्थन - पुढे आमदार दरेकर म्हणाले, जनतेला आणि मतदारांना का गृहित धरायचे. आजपर्यंत शरद पवार यांचे राजकारण संभ्रमित करणारं राहिलयं. लोकांना काय दाखवायचं आहे? मोदींना समर्थन असल्याचे सांगा. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियानं काय समजायचं? आम्हाला समर्थन दिलं असेल तर योग्यच आहे, असे आम्हाला वाटते. सध्याच्या घडीला शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या गटानं भाजपाला समर्थन दिलं आहे, असा अर्थ होतो, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-