पुणे - मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई इमारत कोळून १३ जणांचा मृत्यू झाला. मात्र, सरकार कठोर निर्णय घेताना दिसत नाही. आता डोंगरी परिसरातील इमारतही खेकड्यांनीच पाडली की काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, असे म्हणत अजित पवार यांनी सरकारला टोला लगावला. ते पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पवार म्हणाले, मुंबईमध्ये तर सारख्या इमारती पडत आहेत. यात अनेक नागरीक मृत्युमुखी पडत आहेत. तरीदेखील हे सरकार कठोर निर्णय घेत नाही. मध्यंतरी तिवरे धरण फुटले आणि हे खुशाल सांगतात खेकड्यांनी धरण फोडले. 'खेकड्यांचा जीव केवढा, धरण केवढं'? किती खोटं बोलावं? आता डोंगरी परिसरातील इमारतही खेकड्यांनी पाडली आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डोंगरी घटनेप्रकरणी महिला मुलांचा जीव गेला आहे. पण कुणी म्हणतंय म्हाडाची इमारत आहे, तर कुणी म्हणतंय महानगरपालिकेची जबाबदारी आहे. एकमेकांवर टोलवा-टोलवी करण्यापेक्षा नागरिकांचे जीव वाचवा. त्यांचे प्राण महत्त्वाचे आहेत, असा टोलाही अजित पवार यांनी सरकारला लगावला आहे.