पुणे - जम्मू-काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित 'काश्मीर फाईल्स' ( The Kashmir Files ) हा सिनेमा सध्या देशभरात चर्चेत आहे. या सिनेमातून ऐतिहासिक सत्य सर्वांसमोर मांडण्यात आल्याचं सांगत एका गटाकडून या कलाकृतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे या सिनेमातून धार्मिक द्वेष निर्माण करणारा संदेश दिला जात असल्याचा आरोप करत काही घटक या चित्रपटावर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar on Kashmir Files ) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार? - "संपूर्ण देश एका विचारानं चालला असताना अशातच द काश्मीर फाईल्स सारखा चित्रपट येण्याने समाजात दुरावा निर्माण होऊ शकतो. सामाजिक वातावरणही दुषित होऊ शकते. त्यामुळे असे चित्रपट तयार करणं शक्यतो टाळलं पाहिजे. कारण नसताना हा विषय भाजपने काढणं हे योग्य नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपटाविषयी सांगताना केले आहे. पुण्यात काल रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, या चित्रपटात कळत-नकळत काँग्रेसला दोष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याकाळी काँग्रेसची सत्ता असल्याने तेच काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीला जबाबदार आहेत, असे भाजपकडून म्हटले जात आहे. काश्मिरी पंडितांचा प्रश्न उपस्थित करून भाजपकडून पुन्हा एकदा सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कारण नसताना हा विषय भाजपने काढणं, हे योग्य नाही", असेही ते पुढे म्हणाले.