पुणे - शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच त्याप्रमाणात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. केवळ वेळेत रुग्णवाहिका न मिळल्याने पत्रकार पांडुरंग रायकर आणि वेळेत योग्य उपचार न झाल्याने पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे या दोघांना आपले प्राण गमवावे लागले. या दोन्ही घटनेला महापालिकेचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत गुरुवारी आत्मक्लेश आंदोलन केले.
या आंदोलनात खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, शहरात कोरोनग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शेकडो पुणेकरांचे जीव जात आहेत, तरीही महापालिकडे पुरेशा प्रमाणात सुविधा नाही.आणि भयानक वास्तव म्हणजे पेशंटसाठी बेड उपलब्ध नाहीत. महापालिकेकडे फक्त तीन कार्डिओ अॅम्ब्युलन्स आहेत. मात्र, एनवेळी रुग्णांना मनपा डँशबोर्ड अथवा पुणे हेल्पलाईनकडून योग्य ती मदत मिळत नाही. रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल होईपर्यत तो बेड गेलेला असतो. त्यामुळे रुग्णाला बेडसाठी ताठकळत बसावे लागते. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आरोग्याशी, जीवाशी खेळण्याचे काम हे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा करीत आहे, असा आरोप वंदना चव्हाण यांनी केला. तर, महापौर कोणत्याही प्रकारची माहिती अथवा बैठक घेत नसल्याच आरोपही वंदना चव्हाण यांनी केला.