पुणे- केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने महात्मा फुले मंडईत केंद्र सरकार विरोधात चूल पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन
गेल्या महिन्याभरात केंद्र सरकारने गॅस दरात 100 रुपयांनी वाढ केली आहे. 1 डिसेंबर ला पुण्यात गॅस चे दर 647 रु होते ते आज 697 रुपयांवर गेले आहेत. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोणत्याही जीवनावश्यक वास्तूमध्ये वाढ करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पंतप्रधानांनी पाळले नाही. उलट गॅसच्या दरात सातत्याने वाढ केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या दरवाढीमुळे महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आम्ही या दरवाढीचा निषेध करतो. असे, मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं.
गॅस दरवाढ कमी नाही केली तर तीव्र आंदोलन
केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ कमी करावी. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवावेत. दरवाढीने महिलांना भगिणीचं आर्थिक बजेट कोसळत आहे. केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे. प्रत्यक्षात तर काहीच करत नाहीये. आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलनं करत आहोत मात्र, जर गॅस दरवाढ कमी नाही झाली तर यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा ही यावेळी आंदोलक महिलांकडून देण्यात आला आहे.