पुणे- पुणे ते सातारा महामार्गाच्या कामाला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण केले नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिलायन्स इन्फ्रा कंपनीला बडतर्फीची नोटीस बजावली आहे. याबबत लवकरच कारवाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरील टोलनाका हटवण्यात यावा यामागणीसाठी काम करणाऱ्या खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने याबाबतची माहिती समोर आणली आहे. समितीच्या तक्रारीनुसार, 2010 मध्ये पुणे-सातारा या सहापदरी रस्त्याचे काम चालू करण्यात आले. हे काम 2013 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, रिलायन्स इन्फ्रा कंपनीने अनेक वेळा मुदतवाढ घेऊनही काम पूर्ण केले नाही. त्यामुळे पुणे-सातारा हा मार्ग धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता.
त्यामुळे खेड शिवापूर टोल हटाव अशी मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात येत होती. यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीने अनेक वेळा टोल वरील वसूली थांबवावी याकरिता पाठपुरावा आणि अनेक आंदोलने केली. आता संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आल्याने खेड शिवापूरचा टोलनाका बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.