पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याने अनेकांनी मूक रॅलीत सहभाग घेत निषेध नोंदविला. ओंकारेश्वर पूल ते एस एम जोशी हॉलपर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. त्यात शहरातील अनेक मान्यवर सहभागी झाले. अंनिसच्या दुसऱ्या गटातर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आले.
गोळ्या घालून हत्या : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर पूलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्या प्रकरणाला दहा वर्षे पूर्ण झाले, तरीसुद्धा या हत्येतील गुन्हेगार आणखी सापडलेले नाहीत. सरकारने या विरोधात कारवाईचे आश्वासन देऊनही मुख्य सूत्रधार कुठे आहे, हे अजून कुणालाही ठाऊक नाही. विवेकाची लढाई लढणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांच्या हत्या होणाऱ्या मुख्य सूत्रधाराची अटक व्हावी, यासाठी दरवर्षी अंनिस शांततेच्या मार्गाने वेगवेगळे आंदोलन करते. यावर्षी ओंकारेश्वरपासून मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आलेला आहे.
दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचा शोध : यावेळी बोलताना अंनिसचे अविनाश देशमुख म्हणाले की, कुठलाही खून झाला असेल तर इतकं गुपित राहू शकत नाही. याआधीचं सरकार किंवा आताचं भाजपा सरकार दोघेही राजकीय इच्छाशक्तीमुळे दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना शोधत नाहीत. दाभोळकर यांच्यानंतर गौरी लंकेश कलबुर्गी यांची हत्या झाली. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारपेक्षा कर्नाटक सरकारने चांगला तपास केला आहे.
आम्ही विवेकाने आमची लढाई लढत आहोत. आता न्यायालयाकडूनसुद्धा हा तपास काढून घेण्यात आलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो- अविनाश देशमुख
दाभोळकरांची हत्या : नरेंद्र दाभोळकरांनी 1989 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची संघटना सुरू केली होती. ते या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. अज्ञातांनी त्यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या ओंकारेश्वर पूलावर ४ गोळ्या झाडून हत्या केली होती. ही नियोजित हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा :