पुणे: पुणे शहरात सध्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाही. महाविद्यालयात होणारी भांडणे ही तिथल्या तिथ मिटवली जातात. पण सध्या या भांडणाचा स्वरूप देखील बदलत असून थेट आत्ता गुन्हेगारी पर्यंत जात आहे. पुण्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात घुसून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला विवस्त्र करुन छायाचित्र काढण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे.
अपहरण करणारे ताब्यात: दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांच्या टोळक्याला ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन अल्पवयीन मुले ही सराईत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी पिडीत मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलावर आधीच खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे समस्या निर्माण होत आहेत.
काय आहे प्रकरण?: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगा दत्तवाडी परिसरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात 11 वी इयत्तेत शिक्षण घेतो. तो चार दिवसांपुर्वी घरी जात असताना तळजाई येथे आरोपी आणि इतर काही जणांमध्ये भांडणे सुरु होती. यावेळी पिडीत मुलगा ही भांडणे पाहात थांबला होता. यामुळे आरोपींचा असा समज झाला की, त्यानेच आपल्याला मुले मारायला पाठवली आहेत. यानंतर आरोपींनी दोन तारखेला पिडीत मुलाच्या महाविद्यालयात जाऊन तेथून पिडीत मुलाला दुचाकीवर दोघांच्यामध्ये जबरदस्तीने बसवून आंबेगाव परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले.
असा आला प्रकार समोर: आरोपींनी पिडीत मुलाला काल झालेल्या भांडणातील आरोपींना घेऊन ये असा दम भरला. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याला विवस्त्र करुन छायाचित्र काढली आणि त्याला सोडून देण्यात आले. घडलेला प्रकार त्या मुलाने आपल्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलीस स्टेशन येथे याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कामठे करत आहेत.