पुणे - ताम्हिणी घाटातील पिंपरी गावाजवळील कुंडलिका व्हॅलीजवळ ३ जुलै रोजी एका कारमध्ये जळालेल्या अवस्थेत दोन मृतदेह सापडले होते. विजय साळुंखे (वय ३२) आणि विकास गोसावी (वय २८) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. हा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले असून खवल्या मांजराच्या तस्करीतून मित्रांनी त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक करूम गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - नागपुरात कामठी नगर परिषद सफाई कर्मचाऱ्याची हत्या
अशोक हिलम, गणेश वाघमारे, गणेश पवार, शंकर हिलम, लहाण्या सोनू जाधव या आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख आरोपी अशोक हिलम आणि मृत एकमेकांचे मित्र होते. ते खवल्या मांजरांची तस्करी करण्याचे काम करत होते. काही महिन्यांपूर्वी एका व्यवहारावरून त्यांच्यात वाद झाला होता. काही दिवसांपूर्वी अशोक हिलम आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी पकडले होते. मृत विजय साळुंखे आणि विकास गोसावी यांनीच पोलीसांना खबर दिल्याचा अशोक हिलम याचा समज झाला असल्याने ही हत्या झाली.
हेही वाचा - उस्मानाबादमधील नेट कॅफेमध्ये अज्ञातांकडून एकाची हत्या
याच रागातून अशोक हिलम याने ताम्हिणी घाटात खवले मांजर असल्याचे सांगून तो दोघांनाही तेथे घेऊन गेला. त्यानंतर इतर साथीदारांना बोलावून गळा आवळून आणि मारहाण करून त्यांचा खून केला. दोघांचेही मृतदेह वॅगनॉर गाडीत टाकून गाडी कुंडलिका दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी काही अंतरावर जाऊन थांबली. त्यानंतर त्यांनी गाडी परत ढकलली असता ती पुढे गेली नाही. त्यामुळे त्यांने पेट्रोल ओतून गाडी जाळली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा - शेतकऱ्यांनी कडकनाथ प्रकरणी केली तक्रार दाखल; मंत्री सदाभाऊ खोतांच्या मुलाचे नाव, पोलिसांचा 'यू टर्न'