पुणे - माझ्या भूमिका हे स्पष्ट आहेत. माझ्या भाषणात मी बैल मुतल्यागत काही विचार करत नाही. ज्या आजपर्यंत मी भूमिका मांडल्या आहेत, त्या महाराष्ट्र हिताच्या आहेत, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच प्रत्येक राज्याने आपापली भूमिका व्यवस्थित निभावली पाहिजे. आज आसाम आणि मिझोराममध्ये जे चालले आहे. त्याचे मूळ शोधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही, त्यांना क्लिप कोणी पाठवली, याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही' -
नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. त्यांनी क्लिप कोणी पाठवली याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे. मुळात माझं भाषण हिंदीत होते. ते युपी-बिहारच्या लोकांना कळलं, मात्र, ते तुम्हाला नाही कळलं म्हणून मग मी ते तुम्हाला पाठवेल, असे मी त्यांना बोललो होतो. यावरून लगेच सूत जुळवू नका, असे यावेळी राज ठाकरे यावेळी म्हणाले.
'लॉकडाऊन आवडे सरकारला, अशी या सरकारची परिस्थिती'
राज्याचा कारभार ज्या प्रकारे सुरू आहे. ते योग्य नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सरकारने निदान लसीचे दोन डोज घेतलेल्या लोकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. दुष्काळ आवडे सर्वांना या पुस्तकाप्रमाणे लॉकडाऊन आवडे सरकारला असे म्हणायची वेळ आली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो माझे वैयक्तिक काहीही घेणे-देणे नाही. ज्या भूमिका मला पटत नाही. मी त्यांना विरोध केला आहे आणि ज्या भूमिका पटल्या त्याचे समर्थनही केले आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - झारखंड सरकार प्रकरण : होय मी दिल्लीला गेलो होतो, पण राजकीय कामासाठी नाही; बावनकुळे यांचा खुलासा