पिंपरी-चिंचवड(पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये अनैतिक संबंधातून 27 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून, भोसरी पोलीस तपास करत आहेत. ही घटना भोसरीमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अमन सुरेश डांगळे (वय- 27 रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणाची पत्नी सोनाली अमन डांगळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री तक्रारदार यांचे पती अमन डांगळे त्यांच्या दुचाकीवरून विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ, भोसरी येथे गेले होते. सोमवारी मध्यरात्री सव्वा एक ते पाच वाजताच्या कालावधीत अज्ञातांनी अज्ञात कारणावरून अमन यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूला आणि हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यात अमन याचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी पोलिसांना अमन यांची पल्सर दुचाकी आणि चप्पल आढळून आली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार अनैतिक संबंधातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.