बारामती- रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या मोकळ्या बाटलीत पॅरासिटीमॉल भरुन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या चौघांवर काल तालुका पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर), प्रशांत सिध्देश्वर धरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) व शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) अशी या आरोपींची नावे आहेत.
दवाखान्यात रिकाम्या झालेल्या बाटल्या संदीप गायकवाड गोळा करत असे व त्यात पॅरासिटीमॉल भरुन त्या ओरिजनल बाटल्या आहेत, असे भासवले जायचे. दिलीप गायकवाड हा हेल्थ इन्शुरन्सचे काम करत असल्याने त्याच्याकडे या इंजेक्शनबाबत नातेवाईक चौकशी करायचे. अशा नातेवाईकांना जादा दराने हे इंजेक्शन देण्याचे काम गायकवाड हा प्रशांत धरत व शंकर भिसे यांच्या मार्फत करत असे. तालुका पोलिसांनी बातमीवरुन या चौघांना पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.
दरम्यान, बारामतीच्या गोरड हॉस्पिटलमधील स्वप्नील जाधव (रा. फलटण, जि. सातारा) या रुग्णाला हे बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा जबाब डॉ. गोरड यांनी पोलिसांना दिल्यानंतर वरील चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिली. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या चौघांनी किती जणांना ही बनावट इंजेक्शन्स दिली होती, कोणत्या रुग्णांना ती देण्यात आली आहेत, या बाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत.