बारामती - प्रेमसंबंधात अडसर ठरत असणाऱ्या पतीचा पत्नीने व सख्या भावाने खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथे घडला. या प्रकरणी पत्नी ताई रामदास महानवर व मयताचा सख्खा भाऊ गणेश विठ्ठल महानवर( दोघे रा.शांताईनगर कुतवळवाडी ता.बारामती) यांच्याविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुतवळवाडी शांताईनगर परिसरात वास्तव्यस असणारा गणेश विठ्ठल महानवर याने त्याचा सख्खा भाऊ रामदास विठ्ठल महानवर हा २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून कोणासही काही न सांगता घरातून निघून गेला आहे. त्याचा पोलीस तपास व्हावा म्हणून पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांकडून सदर घटनेचा तपास सुरू असताना २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास बेपत्ता रामदास महानवर यांचा मृतदेह कुतवळवाडी गावच्या हद्दीतील सकट वस्ती येथील विहिरीच्या पाण्यात तरंगत असताना मिळून आला.
विहिरीत आढळला मृतदेह....
विहिरीतून मृतदेह बाहेर काढला तेव्हा मृत रामदास यांच्या पोटाला २० ते २५ किलो वजनाचा दगड इलेक्ट्रिक वायरने बांधलेला व त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जखमेतून रक्त येत असल्याचे आढळले. याबाबतची माहिती सुपा पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान मयत रामदास यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून ठार मारून विहिरीच्या पाण्यात टाकून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केला असल्याची तक्रार मयताचे वडील विठ्ठल महानवर यांनी दिली. सदर तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
हेही वाचा - राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणार अतिविशेषोपचार रुग्णालय
असे फिरले तपासाचे चक्र...
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सदर घटनेसंबंधी विविध बाजूने विश्लेषणात्मक व तांत्रिक पद्धतीच्या मार्गाने तपास केला. पोलीस चौकशी दरम्यान मयताच्या कुटुंबातील व्यक्ती नातेवाईक व गावातील नागरिकांकडे पोलीस तपास करीत असतानाच मयताचा भाऊ गणेश महानवर व मयताची पत्नी ताई महानवर पोलिसांना देत असलेल्या माहितीमध्ये विसंगती व तफावत आढळून आल्याने त्या दोघांकडे कसून चौकशी केली असता मयताची पत्नी ताई व तिचा दीर गणेश यांच्यात मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असून त्यास मयत रामदास हा अडसर ठरत होता. त्यामुळे गणेश व ताई यांनी पूर्वनियोजित कट रचून रामदास यांचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पाण्याने पूर्ण भरलेल्या विहिरीत मयत रामदास यांच्या पोटाला अंदाजे 20 ते 25 किलो वजनाचा दगड निळ्या इलेक्ट्रिकल वायरने बांधून विहिरीत टाकून दिला असल्याची कबुली दोघांनी दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
हेही वाचा - मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञासिंहसह सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश