पुणे - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आलेला पाहायला मिळत आहे. दापोडी येथे मुळा आणि पवना नदीचा संगम होतो, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटिशकालीन 'हॅरिस' पुलाला पाणी लागण्यासाठी अवघे काही फूट अंतर राहिले आहे. दोन्ही नद्यांच्या पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळेच, मुळा आणि पवना नद्यांचा संगम झाल्यानंतर नदीपात्र दुथडी भरून वाहत असून नदीने रौद्ररूप धारण केले आहे.
नदीच्या पाण्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक नागरिक रेल्वे पूल, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर गर्दी करत आहेत. यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहे. दोन्ही नद्यांच्या संगमामुळे दापोडी येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, बोपोडीकडून दापोडीकडे येणारा मार्ग रविवारपासून बंद करण्यात आला आहे.