दौंड (पुणे) - राज्यात या अगोदर देखील आपत्ती आलेली आहे. पूर असेल, भूकंप असेल, परंतु विरोधी पक्षाने कधीही या अगोदर अशा प्रकारचे राजकारण केलेले नव्हते. ज्यावेळी राज्यावर आपत्ती येते त्यावेळी पक्षभेद बाजूला ठेवून,राज्याच्या हिताच्या दृष्टीने मदत करणे आवश्यक आहे. परंतु भारतीय जनता पक्ष केवळ राजकारणाच्या भूमिकेतून या आपत्तीकडे पाहत आहे. हे या राज्याचे दुर्दैव आहे, असे विधान खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
दौंड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी आयोजित दौऱ्यात खानोटा येथे पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेबाबत प्रश्न विचारला असता बारणे यांनी भाजपवर आरोप केला.
यावेळी शिवसेनेचे उपनेते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते तथा विभागिय राज्य समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सत्यवान उभे, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राजेंद्र काळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर, आनंद पळसे
शिवसेना दौंड शहरप्रमुख, देविदास दिवेकर, अनिल सोनवणे, विजयसिंह चव्हाण, समीर भोईटे यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .
पुढे बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, की राज्यात शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभर झालेल्या नुकसानीची पाहणी करून मदत करण्याचे काम राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच करतील.
दौंड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शिवसेना नेत्यांनी केली. तालुक्यातील खानोटा गावातील चौघे जण पुरात वाहून जाण्याची घटना घडली होती. या व्यक्तींच्या घरी भेट देऊन त्यांचे दुःखाचे सांत्वन शिवसेना नेत्यांनी केले. तसेच तालुक्यातील मलठण, राजेगाव, खानोटा यांसह गावांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.