पुणे - मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठींबा आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने विशेष अधिवेशन घ्यावे, असे मुद्दे मांडत खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतल्यानंतर आपल्या शैलीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मते मांडली. संभाजीराजे आणि उदयनराजे यांची सोमवारी (दि. 14 जून) पुण्यात भेट झाली. आरक्षणाच्या मुद्द्यावर दोघात चर्चा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत दोघांनीही आपले मत मांडले.
तशी वेळ येऊ देऊ नका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठा उद्रेक झाला तर कोणी थांबवू शकणार नाही, तशी वेळ येऊ देऊ नका, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
दम असेल तर विशेष अधिवेशन बोलवा
संभाजीराजे यांनी मांडलेली भूमिका मला मान्य आहे. संभाजीराजे करत असलेल्या आंदोलनाला पाठींबा आहे, असे सांगत राज्य सरकारमध्ये दम असेल तर या मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवावे, असे उदयनराजे म्हणाले. सर्व जातींना एकत्र ठेवू शकत नसाल तर देशाची फाळणी व्हायला किती वेळ लागतो. कुठल्याही पक्षाचा काही संबंध नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.
जाब विचारा
गायकवाड समिती आयोग कोणी वाचलाच नाही हे माझे ठाम मत आहे. मात्र, आता लोकशाहीतील राजांना जाब विचारला पाहिजे. आम्ही जात कधी बघितली नाही पण आता मित्रांमध्ये दुफळी होत आहे. हे करण्याचे काम केंद्र आणि राज्यातील राज्यकर्तेच कर आहेत, असे उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे संभाजीराजे भेट
यावेळी संभाजीराजे यांनी मत मांडले, आमच्या मागण्या मान्य करा आम्ही बोललो. दोन्ही छत्रपती घराण्याचा सामाजिक वारसा आहे. आम्ही दिशाभूल करत नाही, असे संभाजी राजे यावेळी म्हणाले. आजच्या बैठकीत उदयनराजे यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. आमचे सगळ्या विषयात एकमत आहे. सर्वच्च न्यायालयाने मराठा समाज आरक्षण रद्द केले. पण, आता आरक्षण मिळवायचे कसे याचा विचार करा, राज्य सरकारला विनंती आहे. आमच्या 5 मागण्या मान्य करा हे राज्य सरकारच्या हातात आहे. नाही तर 16 जूनला आंदोलन होणार, असे संभाजीराजे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांच्या घेतलेल्या भेटीबद्दल आपल्याला काही माहीत नाही, ते आशीर्वाद घेण्यासाठी गेले असतील, असे ते म्हणाले.
हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना.. पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल