जुन्नर(पुणे) - मुलगा होत नाही म्हणून दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यावी यासाठी सातत्याने छळ करणाऱ्या नवऱ्याने बायकोला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यामुळे नवऱ्याच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने दीड वर्ष वयाच्या मुलीसह विहिरीत उडी मारली. हा प्रकार जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात घडला आहे. याबाबत नारायणगाव पोलिसांमध्ये पती, सासू,सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ही आत्महत्या नसून खून करून मुलीला विहीरीत टाकल्याची तक्रार मुलीच्या आई-वडिलांनी केली आहे. हिवरेतर्फे नारायणगाव येथील रंजना अविनाश तांबे व तिची छोटी मुलगी यांचा मृतदेह जवळच असलेल्या विहिरीमध्ये सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी विवाहितेचा पती, दीर, सासू व सासरा अशा चार जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे यांनी दिली. यात महिलेचा पती अविनाश बंडू तांबे, दीर संतोष बंडू तांबे, सासरा बंडू लक्ष्मण तांबे, सासू बायडाबाई बंडू तांबे यांना अटक केली आहे.
अशी घडली घटना..
ढवळपुरी येथील बुधा ठवरे यांची कन्या रंजना हिचा विवाह १५ एप्रिल २००९ रोजी हिवरेतर्फे नारायणगाव येथील देवजाळी शिवारातील अविनाश तांबे याच्याशी झाला होता. त्यांना सुप्रिया (वय ४), श्रीशा( वय दीड वर्ष) या दोन मुली आहेत. वारसदार व वंशाला दिवा म्हणून मुलगा पाहिजे या हट्टापायी अविनाशने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या लग्नास संमती द्यावी यासाठी अविनाशने रंजना हिच्याकडून जबरदस्तीने करारानामा लिहून घेतला होता. मात्र, दुसऱ्या लग्नास पत्नी रंजना व तिचे वडील बुधा ठवरे यांचा विरोध होता. रंजनाला मुली असल्याने व विवाहास विरोध करत असल्याने आरोपी रंजना हिचा शारीरिक, मानसिक छळ करत होते. याबाबतची माहिती रंजना हिने वडील बुधा ठवरे यांना प्रत्यक्ष भेटून व वेळोवेळी मोबाईल द्वारे दिली होती. यामुळे अविनाशने पत्नी रंजनाचा मोबाईल फोडून टाकला होता. ८ जून रोजी आरोपींनी रंजनाला मारहाण केली होती. सततच्या छळाला कंटाळून व पतीने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने रंजना हिने ९ जून २०२१ रोजी सायंकाळी पोपट घुले यांच्या विहीरीत दीड वर्षाची मुलगी श्रीशा हिच्यासह उडी मारून आत्महत्या केली.
बुधा ठवरे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. नारायणगाव पोलिसांनी आरोपींना अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद हिवरे तर्फे नारायणगाव परिसरात उमटले आहेत.
हेही वाचा - मुलीने मागितला जमीनीत वाटा,आईनेच काढला मुलीचा काटा