पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकून पडलाले २ लाखाहून अधिक परप्रांतीय नागरिक स्वगृही रवाना झाले आहे. पुणे विभागातून 3 जूनअखेर 154 विशेष रेल्वेगाड्या परप्रांतीय नागरिकांना घेऊन रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून देशासह राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, यामुळे अनेक परप्रांतीय मजूर, कामगार हे देशभरात अनेक ठिकाणी अडकून पडले. शेवटी सरकारने या मजुरांची स्थिती लक्षात घेत त्यांना स्वगृही पाठवण्याची व्यवस्था केली. या माध्यमातून देशभरातील अनेक परप्रांतीय प्रवासी आपल्या घरी रवाना झाले. पुणे जिल्ह्यातही अडकून पडलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 2 लाख 5 हजार 684 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 3 जूनअखेर 154 विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती त्यांनी दिली.
पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तर प्रदेशसाठी 62, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 8, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मिरसाठी 1, मणिपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओडिशासाठी 2, पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोरामसाठी 1 अशा एकूण 154 रेल्वेगाडया 2 लाख 5 हजार 684 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.