पुणे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 782 च्या घरात गेली आहे. मात्र, अशातच आता पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 550 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 782 वर जाऊन पोहोचली. राज्यातील मुंबईनंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यातील 2 हजार 550 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ससून रुग्णालय आणि शहरातील इतर रुग्णालयांमध्ये अजूनही 1 हजार 977 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी दिवसभरात शहरात कोरोनाचे 179 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत एकूण 255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 176 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यातील 47 रुग्ण व्हेंटिलिटरवर आहेत.