बारामती (पुणे) - इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे नव्याने काम सुरू असलेल्या राऊत पेट्रोल पंपातील डिझेल टाकीमधील तब्बल 7 लाख 51 हजार रुपये किंमतीचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी निखिल नंदकिशोर राऊत (वय 34 वर्षे, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावच्या हद्दीत अकलूज येथील निखिल राऊत यांच्या मालकीचे पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे. या पेट्रोल पंपाचे कामकाज तक्रारदाराचे बंधू निरज राऊत हे अकलूज येथून येऊन-जाऊन पाहत असतात. पेट्रोल पंप सुरू नसल्याने पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय उपलब्ध नाही.
तपासणी केल्यावर डिझेल चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस
दि. 12 डिसेंबरला सकाळी अकरा वाजता निरज राऊत यांनी पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीचे गेज डिपरॉडने (टाकीतील डिझेल मोजण्याचे साधन) चेक केले असता 137.9 म्हणजेच 14 हजार 989 लिटर इतके भरले होते. त्यानंतर 14 डिसेंबरला वरील पद्धतीने डीझेल चेक केले असता टाकीतील डिझेल हे 58 इतकेच म्हणजे फक्त 4 हजार 842 लिटर आढळून आल्याने टाकीत 10 हजार 147 लिटर डिझेल कमी असल्याचे दिसून आल्याने राऊत यांना डिझेल चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.
चोरीची तिसरी घटना
इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव, लासुर्णे पाठोपाठ वडापुरी पेट्रोल पंपातून डीझेल चोरीची तिसरी घटना घडल्याने या मागे सराईत टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा - इंदापुरात कापड व्यापाऱ्याची आत्महत्या; गोदामातच घेतला गळफास
हेही वाचा - पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर