पुणे - शहर जिल्हा आणि विभागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच रुग्ण संख्येत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात बुधवारी (16 सप्टे) एका दिवसात 4हजार 656 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात पुणे शहरात सर्वाधिक 2 हजार 120, त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये 1 हजार 104 तर ग्रामीण भागात 994 बाधित रुग्ण आढळले आहेत.
दुसरीकडे पुणे विभागातील कोरोनाची आकडेवारी पाहिली असता, विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा साडेतीन लाख झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे यातील 2 लाख 58 हजार 182 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 75 हजार 987 इतकी आहे. तर आतापर्यंत पुणे विभागात एकूण 8 हजार 925 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित 2 लाख 31 हजार 196 रुग्णांपैकी 1 लाख 84 हजार 649 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 41 हजार 366 इतकी आहे. तर जिल्ह्यात आता पर्यंत एकूण 5 हजार 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे. कोरोनातनू बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 79.87 टक्के आहे.