पुणे - महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढलेला असताना राज्यातल्या तुरुंगातील कैद्यांना तसेच विविध कारागृहातील कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे मोठ्या संख्येने कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे. जवळपास 10 हजारपेक्षा जास्त कैदी पॅरोलवर आहेत.
महाराष्ट्रामध्ये जिल्हा, मध्यवर्ती आणि खुली अशी मिळून 60 कारागृहे आहेत. कोरोना संसर्गाच्या आधीपर्यंत राज्यातल्या या 60 कारागृहात साधारण 45 हजाराच्या जवळ कैदी होते.
पॅरोलवर सोडले कै दी-
मात्र राज्यात जसजसा कोरोनाचा संसर्ग वाढत गेला, तसतशी कारागृहांमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून आतापर्यंत 10 हजार 788 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे. यामध्ये मार्च ते मे 2020मध्ये तीन टप्प्यात कैदी पॅरोलवर सोडले होते. त्यात येरवडा मध्यवर्ती कारागृहातून 578 कैद्यांना पॅरोल देण्यात आला आहे.
मुंबई मध्यवर्ती कारागृहातून 261, ठाणे मध्यवर्ती कारागृहातून 345, तळोजा कारागृहातून 358, जळगाव जिल्हा कारागृहातून 154, अमरावती मध्यवर्ती कारागृहातून 127, धुळे जिल्हा कारागृहातून 102 असे 60 कारागृहातून कैदी पॅरोलवर सोडण्यात आले.
198 कैद्यांना कोरोना -
राज्यातल्या सर्व कारागृहातल्या कैद्यांमध्ये मिळून सध्या 198 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत सर्व जेलमध्ये 57 हजार 649 चाचण्या करण्यात आल्या. त्यात 3122 कैदी आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळले. त्यातल्या 7 कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. यात पुण्यातील येरवडा कारागृहात सध्या 34, कोल्हापूर कारागृह 29, ठाणे मध्यवर्ती कारागृहात 26, मुंबई मध्यवर्ती कारागृहात 18 आणि नाशिकरोड कारागृहात 15 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3 हजार 818 कर्मचाऱ्यामध्ये सध्या 89 जणांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत 8 मृत्यू झाले आहेत.
कारागृहातही लसीकरण -
कारागृहातही लसीकरण करण्यात आले. 3130 कर्मचाऱ्यांचे लसीकरण झोले आहे. तर 1401 कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.