पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपात अटकेत असलेले पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (DRDO) तत्कालीन संचालक प्रदीप कुरुलकर यांच्यावरील गुन्ह्यांच्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एटीएसच्या हाती त्यांच्या विरोधात महत्वाचे धागेदोरे लागल्याने ऑफीशिअल सिक्रेसी अॅक्ट 1923 च्या कलम 4 नुसार कलम वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्यावर शासकीय गुपीते अधिनियम 1923 कलम 03 (1) (क), 05, (1) (अ), (क), (ड) अन्वये गुन्हा दाखल आहे.
पाकिस्तानी एजंट झारादास गुप्ता सह आरोपी : शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या झारादास गुप्तालाही एटीएसने सहआरोपी म्हणून रेकॉर्डवर घेतले आहे. झारादास गुप्ता आणि कुरुलकर हे दोघेही मोबाईलवर बोलत असताना तो कॉल युनायटेड किंगडममधून आल्याचे भासवले जात होते. प्रत्यक्षात मात्र तो कॉल पाकिस्तानी इंटेलिजन्सकडून येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रदीप कुरुलकर यांनी भारतीय बनावटीच्या संरक्षण यंत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली आहे.
कुरुलकर यांना 3 मे रोजी अटक : कुरुलकर यांचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांचा सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तपास केला गेला. त्यांच्या कृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर एटीएसकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार 3 मे रोजी त्यांना अटक केली गेली. त्यांचा मोबाईल, लॅपटॉप व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. कुरुलकर यांच्या अटकेनंतर त्यांच्याजवळून जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि लॅपटॉप विश्लेषण करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला.
लॅपटॉप गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला : आता तो लॅपटॉप गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. याचबरोबर आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये त्यांचे अनेक गुपीते हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातच्या लॅबचा हा अहवाल महत्वाचा ठरणार आहे. पाकिस्तानी एजंट असलेल्या झारादास गुप्ता विरुध्द एटीएसने गुन्हा दाखल करत तिची सहआरोपी म्हणून नोंद केली आहे.
हेही वाचा :