पुणे- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने घरोघरी सर्वेक्षणावर भर दिले जात आहे. यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी १ हजार ९७७, तर नगरपालिका क्षेत्रासाठी १ हजार २०३ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात ३ लाख ५१ हजार ५१३, तर नगरपालिका क्षेत्रात १ लाख २४ हजार ४३१ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायत क्षेत्रासाठी १०६ झोनल व १ हजार ९७७ सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२० दरम्यान एकूण ३ लाख ५१ हजार ५१३ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात एकूण तपासणी झालेल्या नागरिकांपैकी ४ हजार ७६७ संशयित रुग्ण असून ४ हजार ६०२ नागरिकांची फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ६७४ नागरिक बाधित, तर ३ हजार ८०१ नागरिक निगेटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह असणाऱ्यांपैकी ५७७ रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. १०६ रुग्ण गृह अलगीकरणामध्ये आहेत. निगेटिव्ह असणाऱ्यांपैकी २ हजार ५४२ नागरिक गृह अलगीकरणामध्ये आहेत.
जिल्ह्यातील इंदापूर, जुन्नर, मावळ, शिरूर व बारामती या नगरपालिकांसाठी ४७ झोनल व १ हजार २०३ सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२० दरम्यान एकूण १ लाख २४ हजार ४३१ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. एकूण तपासणी झालेल्या नागरिकांपैकी ९७३ संशयित रुग्ण असून यापैकी ९३१ नागरिकांची फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली. यापैकी १४९ नागरिक बाधित, तर ७८२ नागरिक निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह असणाऱ्यांपैकी ७२ रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून ६७ रुग्ण गृह अलगीकरणामध्ये आहेत. निगेटिव्ह असणाऱ्यांपैकी ४१८ नागरिक गृह अलगीकरणामध्ये आहेत.
हेही वाचा- पुणे जिल्ह्यात बुधवारी आढळले 4656 नवे कोरोनाबाधित रुग्ण