बारामती (पुणे) - तालुक्यात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना राज्य शासनाच्या वतीने अनुदान प्राप्त झाले असून सुमारे 5 कोटी 67 लाख 73 हजार रक्कम नुकसानग्रस्तांना मिळाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अनुदानामध्ये मृत व्यक्ती, पुरामुळे बाधित कुटुंब, मृत जनावरे, पडझड झालेली घरे, शेतजमिनीचे झालेले नुकसान, शेतातील पिकांचे नुकसान अशा पध्दतीने वर्गवारी करण्यात आली असून नुकसानग्रस्तांना शासनाने दिलेल्या जवळपास सर्व अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. बारामती तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. शेतीसह, पिके, घरे, जनावरे यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. महसूल विभागाने पंचनामे पूर्ण करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घेतला होता.
देण्यात आलेली रक्कम
पुराने बाधित सुमारे 2 हजार 707 कुटुंबाना सानुग्रह अनुदान म्हणून 5 हजार रुपये याप्रमाणे सुमारे 1 कोटी 35 लाख 35 हजार रुपये वर्ग करण्यात आले. तीन मृतांना 12 लाख तर 8 गायी-म्हैस, 74 शेळी-मेंडी आणि सुमारे 4 हजार 847 मृत झालेल्या कोंबड्या यासाठी 3 लाख 88 हजार रक्कम देण्यात आली. पडझड झालेल्या घरांची संख्या 338 असून प्रतिघर 6 हजार याप्रमाणे सुमारे 16 लाख 44 हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. 1 हजार 563 शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून जाणे यासाठी 9 लाख 75 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. शेत पिके नुकसानीसाठी 10 हजार आणि 25 हजार प्रमाणे 25 हजार 540 शेतकऱ्यांना सुमारे 39 लाख 30 हजार रुपये अनुदान जमा झाले आहे. अनुदानाची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना शेती दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, माती यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
हेही वाचा - सव्वा महिन्याच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू; बारामतीमधील धक्कादायक प्रकार