पुणे - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Lop Devendra Fadnavis ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष असल्याचे मध्यंतरी सांगितले होते. ( Devendra Fadnavis on NCP ) त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule ) यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ते त्यांचं वयक्तिक मत आहे. मात्र, ते एक गोष्ट विसरले की त्यांच्याच केंद्र सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण दिलं होते. हे ते सांगायचं विसरले असतील, असा टोला सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना लगावला. ( Supriya Sule Reply to Devendra Fadnavis ) वारजे माळवाडी येथील अरविंद गणपत बारटक्के दवाखान्याला सुप्रिया सुळे यांनी आज (सोमवारी) भेट दिली. यानंतर ते बोलत होते.
ऑनलाईन शिक्षणामुळे देशासह राज्यात देखील मुलांचे खूप नुकसान -
माझी महाराष्ट्र सरकारला प्रांजळ विनंती राहील की ब्लॅंकेट शाळा बंद करणे हा निर्णय किती योग्य आहे. राज्यातील काही भागांमध्ये या कोरोना काळात खूप चांगल्याप्रकारे शाळा चालवल्या जात आहे. माझी राजेश टोपे यांना विनंती आहे की त्यांनी टास्क फोर्सबाबत बैठक घेऊन ज्या ठिकाणी शाळा सुरू आहे त्याचा डाटा गोळा करावा आणि काहीतरी मार्ग काढून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार करावा. ऑनलाईन शिक्षणामुळे देशासह राज्यात देखील मुलांचं खूप नुकसान झाले आहे. ते कुठंतरी भरून काढण्याची गरज आहे. पालकांनी देखील याबाबत निर्णय घ्यावा की शाळा सुरू असेल तर मुलांना पाठवायचं की नाही? स्थानिक पातळीवर प्रशासन आणि पालकांनी मिळून त्या त्या भागाचा निर्णय घ्यावा, असेदेखील यावेळी त्या म्हणाल्या.
सत्य काय आहे यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केलं पाहिजे -
अभिनेता किरण माने यांच्या प्रकरणावर यावेळी सुळे म्हणाल्या की, या प्रकरणात वर्तमानपत्र आणि मीडियातून मिक्स सिग्नल मिळत आहे. काही त्यांच्या बाजूने येत आहे तर काही त्यांच्या विरोधात येत आहे. नेमके काय झाले आहे याची स्पष्टता अजूनही येत नाहीय. खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केलं आहे. सत्य काय आहे यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे, असेदेखील यावेळी सुळे म्हणाल्या.
विरोधकांना बोलण्याचा अधिकार तर मुख्यमंत्री त्यांचं काम करताय -
मुख्यमंत्री बदलाबाबत विरोधी पक्षांकडून जी मागणी होत आहे त्यावर देखील सुळे म्हणाल्या की, विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते बोलत राहावं. मुख्यमंत्री हे त्यांचं काम करत राहतील. कोरोना काळात परदेशातून ते केंद्र सरकारने या राज्याचे कौतुक केलं आहे. खूप सक्सेस स्टोरी केंद्राने राज्याच्या दाखवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे कौतुक फक्त राज्यातील जनता करत नाही तर केंद्र सरकारदेखील करत आहे, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - N.D.Patil Passed Away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचे निधन
उत्तरप्रदेशची जनता दोघांना चांगलं काहीतरी करण्याची संधी देईल -
देशात ज्या पाच राज्यात निवडणूक होत आहे त्यावर सुळे म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमध्ये एक नवीन बदल दिसत आहे. ज्या पद्धतीने भाजपमधून लोक बाहेर पडत आहे आणि अखिलेश यादव यांना ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत आहे ते बघता उत्तर प्रदेशमध्ये बदल होईल. गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशमध्ये जे मोठे प्रकल्प व्हायला पाहिजे. ते प्रकल्प झाले नाही. ज्याप्रमाणे लोकांचं म्हणणं आहे त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये बदल होणार आणि आम्ही सगळेच अखिलेश आणि जयंत चौधरी यांच्याकडे खूप अपेक्षेने पाहत आहोत. मला विश्वास आहे की उत्तर प्रदेशची जनता या दोघांना चांगले काहीतरी करण्याची संधी देईल, असे यावेळी सुळे यांनी सांगितले.