बारामती: आम्हाला दरमहा पाच हजार रुपये खंडणी दिली नाही तर हाॅटेल चालू देणार नाही, असे म्हणत टोळक्याने बारामतीत हाॅटेलची मोडतोड (Hotel wreckage in Baramati) करत तेथील लोकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बारामतीत घडली. शहर पोलिसांनी या प्रकरणी पाचजणांविरोधात प्राणघातक हल्ल्यासह खंडणी आणि अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आदेश कुचेकर, तेजस बच्छाव (दोघे रा. साठेनगर, बारामती), साहिल शिकिलकर (रा. लहुजीनगर, बारामती), पप्पू चंदनशिवे (रा. पंचशीलनगर, बारामती) आणि यश जाधव (रा. जूना मोरगाव रोड, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्याद दिली: याप्रकरणी रामवृजसिंग अजुहदी प्रसाद वर्मा (वय ३८,मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. फलटण रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे गेल्या दहा वर्षांपासून बारामतीत राहत आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी फलटण चौकात एक गाळा भाडोत्री घेत तेथे दुर्वाज या नावे हाॅटेल सुरु केले आहे. त्यांच्यासोबत नातेवाईक कालुवा राममुर्ती (वय २८) तेथे काम करतो. मंगळवारी (दि. ८) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे असणारे हे पाचजण तेथे गेले. त्यातील आदेश कुचेकर हा महेंद्र कुठे गेला आहे, त्याला लय मस्ती आली काय. मी त्याला भेटायला बोलावले होते. तो आला नाही. आज किती तारीख आली, हप्ता कोण त्याचा बाप देणार का, मी आत्ताच एका बारच्या मालकाकडून हप्ता वसूल करून आलोय, असे म्हणाला.
धमकी दिली: त्यावर वर्मा याने आज मालक येथे नाहीत असे सांगितले. त्यावरून कुचेकर याने त्यांच्या पोटाला चाकू लावला. कालुवा हा तेथे आला असता तेजस बच्छाव याने त्याच्याकडील कोयता जीवे मारण्याच्या हेतून कालुवाच्या डोक्यात मारला. त्यात त्याच्या डोक्यात मोठी जखम होवून रक्तस्त्राव होवू लागला. यश जाधवने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कुचेकर याने तु हप्ता देणार आहेस की नाही, आम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील नाही तर धंदा चालू देणार नाही. तुला येथून उडवून टाकीन अशी धमकी दिली.
या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली: फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना त्यांनी हाॅटेलातील खुर्च्या आणि अन्य साहित्याची मोडतोड करत तलवार फिरवून शिविगाळ केली. या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी दुकाने बंद केली. तु जर पोलिसांना सांगितले तरी पोलिस माझे काय उखडणार नाहीत पण तुला कायमचा उखडून टाकीन असे म्हणत कुचेकर आणि त्याचे सहकारी तिथून निघून गेले. त्यानंतर फिर्यादीने कलुवा याला तात्काळ दवाखान्यात नेले असता त्याला डोक्याला सात टाके घालावे लागले. त्यानंतर या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली.