पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बाबत मनसे नेते वसंत मोरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पावसाळी अधिवेशनानंतर अजित पवारच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास मनसे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी वसंत मोरे यांनी तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, महापालिका निवडणुका घ्या, अशी मागणी केली आहे.
महापालिका निवडणुका घ्या : राष्ट्रवादीच्या बंडानंतर राज्यात सत्ता हस्तांतरित झाली. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे अजित पवार इतके दिवस सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या, अशी मागणी केली होती. मात्र आता अजित पवारच सत्ताधारी पक्षात गेल्याने पवारांनी महापालिका निवडणुका घ्याव्यात. लोकांच्या, नगरसेवकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
आरक्षणाबाबत न्यायालयात खटला : महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची मागणी करत आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे निवडणुका होत नसल्याचे बोलले जात आहे. पण न्यायालय दोन महिन्याच्या दोन तारखा का देते यावर आठ दिवसात सुनावणी करून निर्णय घ्यावा, असे मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले आहे.
मनसे युती करणार नाही : राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. आता मनसे युती न करता निवडणूक लढवणार असल्याचे पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याने आम्ही बैठक घेत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व अजित पवारांना माहीत असल्याने या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, ही आमची मागणी असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार असताना महापालिकेचे प्रभाग तीन करण्यात आले होते. आता अजित पवार सरकारमध्ये असल्याने त्यांनी तयार केलेली प्रभाग रचना आणून निवडणुका घेण्याची मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
स्वराज्य संस्थेच्या निवडणुका : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती, मात्र आता तशी कुठलीही शक्यता आता तरी नाही. भाजप लोकसभा नंतर राज्याची विधानसभा, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेईल असे मला वाटते अशी प्रतिक्रिया सुद्धा वसंत मोरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Monsoon Session 2023 : विरोधी पक्ष आहे कुठे? अजित पवार आमच्याकडे आल्याने...; सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका