पिंपरी-चिंचवड : मनसेच्या जिल्हा संघटकने शाळेची बदनामी व आंदोलन टाळण्यासाठी खंडणी मागितल्याची घटना ताजी असताना, शिरुरमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षाने एका खासगी कंपनी मुळे होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार मागे घेण्यासाठी वीस लाखाची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे. वीस लाखांच्या मागणीनंतर टोकन एक लाख रुपये स्वीकारताना मनसे पदाधिकारी कैलास नरके याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी नरकेसह चार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल..
पिंपरी-चिंचवड एमआयडीसी मधील स्टार इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार शिरूर मनसे तालुकाध्यक्ष कैलास नरके याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. यानंतर त्याने कंपनीविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी कंपनीकडे वीस लाखांची मागणी केली होती. याप्रकरणी नरके यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रीजनल ऑफिस डॉक्टर जितेंद्र संगेवार, आशिष उबाळे आणि पंढरीनाथ साबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखेर सर्व जण अडकले पोलिसांच्या जाळ्यात..
स्टार इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याबाबतची तक्रार प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे करण्यात आली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकाऱ्यांसमवेत मनसेच्या शिरूर तालुका अध्यक्ष नरके यांनी वीस लाखांची खंडणी मागितली होती. मात्र, ते पोलिसांच्या अलगद जाळ्यात अडकले आणि त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत कपिल सुभाष पाटील यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित कारवाई करण्यात आली.