पुणे - जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज पुण्यातील विविध चौकात 'मी मराठी.. स्वाक्षरी मराठी' अभियान राबविण्यात आले. राज्यातील नागरिकांमध्ये मराठी भाषेबद्दल गोडवा वाढवा आणि मराठीत स्वाक्षरी करावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गेल्या 12 वर्षांपासून मराठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे.
दैनंदिन व्यवहारामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी मराठीत बोलावे, तसेच मराठीतच स्वाक्षरी करावी, या उद्देशाने मनसेतर्फे मी मराठी..स्वाक्षरी मराठी अभियान सुरू करण्यात आले. आम्हाला कोणत्याही दुसऱ्या भाषेचा अनादर नसून महाराष्ट्रात मराठीतच बोलावे, मराठीतच व्यवहार करावेत या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात या अभियानाला प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी ज्येष्ठ नागरिक येऊन मराठीत स्वाक्षरी करत आहेत, अशी माहिती आयोजक रवी सहाणे यांनी दिली.
यंदा खबरदारी म्हणून मास्कचे वाटप
राज्यासह शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा सुरक्षित अंतर राखणे, मास्क घालणे या सर्व नियमांचे पालन करून मी मराठी...स्वाक्षरी मराठी अभियान कार्यक्रम घेण्यात आला आहे. यंदा स्वाक्षरी करणाऱ्याला मास्क देण्यात आला. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हे उपक्रम घेण्यात आले, असेही यावेळी सहाणे म्हणाले.
इतर भाषेबद्दल आदर पण महाराष्ट्रात मराठीच
आम्हाला इतर भाषेबद्दल आदर आहेच, पण महाराष्ट्र्रात राहत असताना मराठी भाषेबद्दल आदर, प्रेम असलेच पाहिजे. दैनंदिन व्यवहार मराठीतच करायला पाहिजे. महाराष्ट्र्रात राहत असताना मराठी बोललेच पाहिजे. आम्हाला इतर भाषांबद्दल आदर आहे, तसा इतर भाषिकांनासुद्धा मराठीबद्दल आदर असलाच पाहिजे, असेही रवी सहाणे यांनी सांगितले.