पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोप केला होता'. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी 'राज ठाकरेंना पुरंदरे यांच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही', अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता संभाजी ब्रिगेड व मनसेत संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणले, '2019 च्या लोकसभेला पुण्यातून इच्छुक असणारे प्रवीण गायकवाड, मी स्वतः पाहिलय गल्लोगल्ली मी प्रवीण गायकवाड, मी प्रवीण गायकवाड म्हणत फिरताना, अशांना राज ठाकरे काय कळणार, लायकीत राहायचे नाही तर पुण्यात फिरणे मुश्किल करू', अशा शब्दात प्रवीण गायकवाड यांच्यावर वसंत मोरे यांनी टीका केली आहे.
तर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राज ठाकरे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या घटना राजकारणातून सांगत रोखठोक बोलत असतात. तरीही काही असंतुष्ट लोकांना, बिनकामी लोकांना त्यांच्याबद्दल बोलायचे असेल तर त्यांनी चौकटीत राहून बोलावे, आपली पात्रता सोडून बोललात तर मनसैनिकांना जशास तसे उत्तर देता येते', अशी पोस्ट करत रूपाली पाटील यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर टीका केली आहे.
काय आहे प्रकरण
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, "राज ठाकरेंना जसे पुरंदरेच्या इतिहासा पलिकडे आकलन नाही, तसेच त्यांना येथील राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षाचे हे आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे," असे लिहीले होते.
ज्याप्रकारे सोशल मीडियावर संभाजी ब्रिगेड आणि मनसेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरू आहेत. ते पाहता येत्या काही दिवसात या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारानंतर राज ठाकरे आपल्यावर झालेल्या टीकेला कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - पिंपरीत लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने केला विवाहित प्रियकराचा खून