दौंड (पुणे) - पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा
पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारून, ८ ते १० तास रांगेत उभे राहून देखील रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
औषधांचा काळा बाजार रोखावा
रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा दूर करून पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर व तत्सम औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी अशी मागणी दौंड चे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसोबतच हे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे पाठवले आहे.