पुणे - खेड सभापतींच्या मारहाण नाट्यामागे मी जर असेल तर आढळरावांनी पत्रकारांना सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना सांगावे आणि माझी शक्य तेवढी उच्च पातळीवर चौकशी करावी. मात्र त्या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही तर, आढळरावांनी तोंडाला काळे फासून खेड तालुक्यात यावे, असे प्रत्युत्तर आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर दिले.
लोकसभेची निवडणूक हरल्यापासून ते नैराश्यग्रस्त झालेले आहेत. राज्यात तीन पक्षांची आघाडी झाल्याने, आपल्याला शिरूर मधून पुन्हा तिकीट मिळणार नाही, हे त्यांना ठाऊक असल्याने, ते शिवसेनेने बाहेर जायचे निमित्त शोधत असून काही ना काही वाद निर्माण करून, शिवसेनेतून बाहेर पडून भाजपमध्ये जाण्यासाठी ते वातावरण निर्मिती करत असल्याचे आमदार मोहिते म्हणाले.
डोणजे येथे झालेल्या हल्ल्याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये आलेले आहे. तरीही आढळराव तसं घडलं नाही, असे धादांत खोटे बोलत आहेत. त्यामध्ये पोलीस तपास करत असून, सत्य काय आहे ते लवकरच समाजापुढे येईल. भगवान पोखरकर यांच्या राजीनामा नाट्यामागे आम्ही नसून त्यांच्याच पक्षातले नाराज सदस्य आहेत. माझ्या पक्षाच्या सदस्यांच्या धमक्या येऊ लागल्याने, संरक्षणासाठी मी त्यांना माझ्या भावाच्या रिसॉर्टवर आणून ठेवले होते, एवढाच यातील माझा रोल आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांचे माझ्याबरोबर बोलणे झाले होते आणि हा वाद बसून आपण सामंजस्याने मिटवू, असे ते मला म्हणाले होते. परंतु त्यांच्याबरोबर बैठक होण्याअगोदरच आढळरावांनी हा हल्ला घडवून आणला. कोयते, कुऱ्हाडी घेऊन त्या ठिकाणी लोक आले होते. त्यांनी गोळीबारही केला, असा आरोप मोहिते यांनी केला आहे.
माझ्यावर केलेले विनयभंगाचे गुन्हे राजकीय हेतू समोर ठेऊन केलेले खोटे गुन्हे होते. त्यामुळे ते पोलीस चौकशीत टिकले नाहीत. त्यामागेही आढळरावच होते. पोखरकरांवरचे विनयभंगाचे गुन्हे मात्र सत्य असून त्यांनी आदिवासी सरपंच महिलेचा विनयभंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईही झालेली आहे. असा गुंडागर्दी करणारा सभापती तालुक्याला चालेल का? असा सवाल करून ते म्हणाले, अशा सभापतीचे समर्थन आढळराव करत असतील, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.'
शिरूरमधील आमदारांना घरात घुसून मारण्याची धमकी देतात, जुन्नर पंचायत समिती आढळरावांच्या हातातून गेली आहे. तेथे आशाताई बुचके आणि त्यांच्यात वितुष्ट आहे. आंबेगावात त्यांचे काही चालत नाही. भोसरी, हडपसर येथे तर त्यांचे अस्तित्वच राहिलेले नाही. खेड तालुक्यात शिवसेनेत नेतृत्व शिल्लक राहिले नसल्याने, तालुक्यात येऊन वाईट घटना घडवून, खेडचे वातावरण खराब करण्याचे काम ते करतात. सतत खेड तालुक्यात लक्ष घालतात. मी मात्र विकासात गर्क असल्याने अन्य गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे खरोखर वेळ नाही, असेही मोहिते म्हणाले.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अतिशय खोटारडे असून 'सौ चूहे खाके, बिल्ली चली हज को' अशी त्यांची भूमिका असते. खेडच्या हल्ल्यामागे व नाट्यामागे आढळराव पाटील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, याचा मी पुनरुच्चार करतो. असे प्रत्युत्तर आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी, त्यांच्यावर आढळराव पाटील यांनी केलेल्या आरोपांवर दिले.