पुणे - खेड(राजगुरूनगर) तहसीलदारांच्या बदलीवरून तालुक्यात आमदार विरुद्ध तहसीलदार असे समीकरण जुंपले आहे. ही लढाई आता विकोपाला जात असून तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यापासून जीवाला धोका असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पोलीस संरक्षणाचीदेखील मागणी केलीय. गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदारांच्या पतीवर पोलिसांनी कारवाई करावी, असे ते म्हणाले. यााबाबत त्यांनी खेड पोलीस ठाण्याला समक्ष येऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.
सुचित्रा आमले यांची खेडच्या तहसीलदारपदावर नियुक्ती झाल्यावर तालुक्यातील अनेक गावात अवैध कामं सुरू असल्याचा आरोप स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांनी केला. जमिनीच्या नोंदी, दाखले, रेशनकार्ड आदींसाठी तलाठी, सर्कल अधिकारी यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक होत आहे, असे म्हणाले.
तहसीलदारांच्या या मनमानी कारभाराबाबत अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी व नागरिकांनी तक्रारी केल्यावर लोकप्रतिनिधी या नात्याने आपण चौकशी सुरू केली. मात्र, हे केल्यावर तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे माझ्या जीवाला धोका निर्माण होतील अशी थेट वक्तव्य केली आहेत. त्यांच्याशी माझा थेट संपर्क आलेला नाही. मात्र, हा माणूस गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरत असल्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार सुचित्रा आमले व त्यांचे पती बाळासाहेब आमले यांना जबाबदार धरावे असेही, ते म्हणाले.
संबंधित तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.