पुणे - थकलेल्या एफआरपीची रक्कम दिली नाही तर कारखानदारांची व्यक्तीगत मालमत्ता जप्त करा अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. 2015 पासून 2019 पर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम अजूनही अनेक कारखान्यांकडे अडकून आहे. साखर कारखान्यांकडे जवळपास 1 हजार 400 कोटींची रक्कम बाकी आहे. ही रक्कम तातडीने वसूल करावी अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.
आज प्रहार संघटनेच्या वतीने पुण्यातील साखर आयुक्त संकुलावर आंदोलन केले. यावेळी २०० ते ३०० कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तालयाच्या इमारतीवर चढत सहकारमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रहार संघटनेच्या या आंदोलनाची दखल घेत साखर आयुक्तांनी तातडीने बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एफआरपीची रक्कम थकवणाऱ्या साखर कारखानदारांवर तसेच संचालकांची वैयक्तिक मालमत्ता तातडीने जप्त करून शेतकऱ्यांना पैसा दिला जावा अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी यांनी केली.
कधी कारवाई करणार यांची विचारणा केली असता येत्या २ दिवसात याची माहिती देऊ असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ऊसाच्या संदर्भातली माहिती ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडून मोबाईल अॅप तयार करण्यात येत आहे. ते तातडीने तयार करावे असे बच्चू कडू यावेळी म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. मात्र, सहकारमंत्री याला खोडा घालत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. एफआरपीच्या आकडेवारी संदर्भातली माहिती शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अॅपच्या माध्यमातून मिळाल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती सहकारमंत्री सुभाष देशमुखांना वाटत आहे. त्यामुळे ते यामध्ये खोडा घालत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. मात्र, हे अॅप तातडीने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आले नाही तर सुभाष देशमुखांना घेराव घातला जाईल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.