चाकण (पुणे) : भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा अखेर तपास लागला असून नात्यातील अल्पवयीन मुलाने एकतर्फी प्रेमातून तीची हत्या केल्याची कबुली दिली. चाकण पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला अटक केली असल्याची माहिती पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याने चाकण परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज असल्याचे सांगत घटनास्थळाची पाहणी दरेकरांनी केली होती. तसेच त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. मंगळवारी अखेर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन नात्यातीलच अल्पवयीन मुलाने एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणात संशयीत म्हणून तिघांना अटक केली असून, त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, आता या संशयितांना सोडून देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन तरुणीच्या हत्येप्रकरणी मुलगा घटनास्थळी पोलिसांसमवेत फिरत होता तरुणीच्या हत्येच्या घटनास्थळाची माहिती पोलिसांना देत असताना या तरुणाच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची अखेर कबुली दिली असून, पोलिसांनी अटक केली आहे.
भामा-आसखेड परिसरात तीन हत्या -
भामा-आसखेड परिसरात तीन वर्षात तीन तरुणींना विवस्त्र करून निर्घृण हत्या करण्यात आल्या आहेत. यातील दोन हत्या या नात्यातील व्यक्तीने केल्याचे समोर आले असून एका प्रकरणात अद्यापही आरोपी फरार आहे. त्यामुळे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रवृत्ती या परिसरात उदयास येत असल्याने अशा प्रवृत्ती वेळीच ठेचून काढण्याची गरज आहे.