पुणे - ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका कोरोनाबाधित महिलेने बाळाला जन्म दिला आहे. सुदैवाने नवजात बाळाला कोरोनाची बाधा झालेली नाही. परंतु, आई कोरोनाबाधित असल्यामुळे या बाळाला आईजवळ घेऊन जाता येत नसल्याने त्याला आईचे दूधही देता येत नाही. अशावेळी ससूनमध्ये असलेल्या मिल्क बँकेची मदत झाली आहे. मिल्क बँकेत जमा असलेले दूध या बाळाला दिले जात आहे.
ससून रुग्णालयात सध्या दीड ते दोन वर्षांची पाच लहान मुले आहेत. त्यांना आईजवळ जाता येत नाही. अशा मुलांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही मुले कोरोनाबाधित असली तरी त्यांच्यातील लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. आईपासून दूर असलेल्या या मुलांना 'मिल्क बँके"तूनच दूध दिले जात आहे. याशिवाय मुलांना एका जागी ठेवण्यासाठी काही गोष्टीत रमवणे गरजेचे असते. यासाठी विविध खेळणी, रंग, पुस्तकांची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाने केली आहे.
मिल्क बँक म्हणजे काय ?
एखाद्या महिलेला दूध अधिक असल्यास हे दूध मिल्क बँकेत साठविण्यात येते. ज्या बाळाला आईचे दूध मिळत नाही, त्यांना या मिल्क बँकेतून दूध दिले जाते.
अशी चालते दूध संकलनाची प्रक्रिया -
ज्या मातांच्या शरीरात दुधाचे प्रमाण जास्त आहे, त्या मातांची दूध संकलनाच्या दृष्टीने सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी केली जाते. दुधावाटे लहान बाळांना रोगांची लागण होऊ नये, याकरता खबरदारीचा उपाय म्हणून दान करण्यात आलेल्या दुधाची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. सोबतच आई-वडिलांच्या परवानगीनंतरच बाळाला मिल्क बँकेतील दूध पाजण्यात येते.