पुणे : पुणे शहराला विद्येचे माहेरघर तसेच सांस्कृतिक राजधानी देखील म्हटले जाते. या सांस्कृतिक राजधानीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी 2023 ते मे 2023 या पाच महिन्यात पुणे पोलिसांनी तब्बल 7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तसेच या 5 महिन्यात 50 गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात 75 आरोपींना अटक करण्यात आली आहे. असे असताना देखील आज पुण्याच्या मध्यवर्ती भागात विक्रीसाठी आणलेले 10 लाख रुपये किमतीचे "म्याव म्याव" (मेफीड्रोन) ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
आरोपी मुजाहिदला अटक : याप्रकरणी पोलिसांनी मुजाहिद अनवर शेख (25 ) याला, समर्थ पोलीस स्टेशन हद्दीमधील रोशन मस्जिदजवळ अटक केली आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुजाहिद अनवर शेख हा काहीतरी अंमली पदार्थ विक्री करिता समर्थ पोलीस स्टेशन हद्दीमधील रोशन मस्जिद जवळ येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या संदर्भात कारवाई करताना संशयावरून त्याला ताब्यात घेतले आहे. त्यांची झडती घेतली असता त्याच्या जवळ १०,४०,००० रुपये किमतीचे ५२ ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ, तसेच १०,००० रुपयांचा एक मोबाईल असा एकूण १०,५०,००० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी मुजाहिद याला अटक केली असून त्याच्याकडून पुढील तपास सुरू आहे.
एनसीबीची मोठी कारवाई : या आधीही अशीच एक घटना घडली होती. एनसीबी मुंबई विभागाने डोंगरी, मुंबई येथून अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या सिंडिकेटचा भांडाफोड केला होता. 20 किलो मेफेड्रोन जप्त करत 3 जणांना अटक केली होती. अनेक शोध मोहिमांमध्ये डोंगरी येथून 20 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. तसेच सिंडिकेटच्या 3 प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली होती. एक कोटी दहा लाख 24 हजार रुपये रोख रक्कम आणि 186.6 ग्राम सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आले होते.
हेही वाचा -